वांग्याचं भरीत

नमस्कार मंडळी…. कधी कधी एखाद्या छोट्या गोष्टीला पण आपण असे react होतो नं कि अगदी होत्याच नव्हतं होऊन जात. 

आता मला सांगा वांग्याचं भरीत कोणाचं ठरलेलं लग्न मोडू शकतं का हो???? 

बघा तुम्हीच…



मिनू…अग मीने उठतेस नं??? 

आज किनई मी खास जावईबापू साठी वांग्याची भरीत केलंय त्यांना आवडतं न माझ्या हातचं.मागच्या वेळी केलेलं तेव्हा म्हणत होते आई पुन्हा करून पाठवा.... लाखात एक जावई आहे हो माझा… आता तू लवकर उठ आणि दे त्यांना हे भरीत….  

हो ग आई सकाळी सकाळी काय भरीत भरीत चालवलंय बघीन मी फोन करून. श्या... आज रविवार चा पार मूड घालवला राव आईने 'वांग्याचं भरीत आणि भाकरी' हा काय मेनू आहे का 😓😓 

मला अजिबात आवडत नाही वांग माहित आहे तिला.....  पण माझ लग्न ठरल्या पासून माझी आवड निवड विचारात घेताय कोण…….  आई ला नुसतं होणाऱ्या जावयाच कौतुक.….  

जाऊ देत मी आपलं फोन करते नवऱ्याला तेवढाच तो खुश.


(सर बॉडी एवढी खराब झालीये ओळख पण पटणार नाही.) अरे हो पण पंचनामा तर करायला पायजे ना.….  साली काय कटकट आहे नाईट संपवून घरी जाऊन आराम करू म्हटलं तर रविवारी सकाळी सकाळी ही बॉडी सापडली.….  असो आलिया भोगासी… आहो शिंदे ती बॉडी न्या लवकर फोरेन्सिक ला केवढा वास येतोय.….  

ट्रिंग ट्रिंग… ट्रिंग ट्रिंग… 

हेल्लो शोना Good Morning काय कत्तो माझा पिल्लू… मीने सकाळी सकाळी कशाला फोन केलायस काही काम असेल तर बोल पटकन नाहीतर नंतर फोन कर मी कामात आहे.…. 

किती खडूस आहेस रे तू 

एकतर इतका लाडात फोन केला तुला दोन शब्द प्रेमाचे बोलता येत नाहीत…… तसही आज पर्यंत तू केलस काय माझ्या साठी…. तू असाच … तू तसाच……. 

हं मी खडूस आहे न मग ठेव फोन आणि पुन्हा फोन करू नकोस मी कामात आहे.…. (सर खिशातल्या ओळखपत्रावरून हे आमदाराच पोरगं वाटतंय)…आई शप्पत त्या साल्या xxxx ला पण आत्ताच मरायचं होत का….  झाली आता आमची दिवाळी पण बोंबलली…. 

ट्रिंग ट्रिंग… ट्रिंग ट्रिंग… 

हेल्लो अग मीने तुला एकदा सांगून कळत नाही का कामात आहे म्हणून का सारखा फोन करतेय.…

मला पण काही हौस नाही आली तुला फोन करण्याची आज आई ने वांग्याचं भरीत केलाय ते तुला द्यायचं म्हणून फोन केला…. 

अरे यार तुम्हाला कळत नाही का कशाला केलं आज भरीत मला नकोय ते मी नाही घेऊ शकणार…. 

असं कसं असं कसं वा रे वा  एकतर माझ्या आईने खास तुला आवडतं म्हणून भरीत केल आणि तू चक्क तुम्हाला कळत  नाही का म्हणतोस अपमान करतोयस तू माझ्या आई चा तोंड सांभाळून बोल……

 ए बाई तूंला  शेवटच सांगतोय डोक्यात जाऊ नकोस मला वेळ नाही फोन ठेव…… 

ट्रिंग ट्रिंग… ट्रिंग ट्रिंग… 

अग डोक फिरलंय का तुझ अक्कल गहाण  ठेवलीस का की  देव अक्कल देत होता तेव्हा चाळणी घेऊन घेली होतीस…..  कटकट करू नकोस गं…. एकदा सांगितल नं  तुमचं भरीत नकोय मला आई ला सांग खा तुम्हीच.



जावई बापू…… आहो….  हे…  हे….  असे बोलता तुम्ही माझ्या बद्दल…वाटलं नव्हतं हो मला स्वप्नात सुद्धा… ही  मिनी नाही म्हणाली म्हणून मी स्वतः फोन केला तुम्हाला…पण बरंच झाल लग्नाच्या आधी खर रुपं समोर आलं तुमचं…. 

आई आई आहो जरा ऐका माझ…. 

काही आई म्हणू नका मला, समोर गोड गोड बोलून मागे अगदी वाट्टेल तसे बोलता तुम्ही मला आणि माझ्या मिनू ला.…. आहो फुला सारखं जपलं मी माझ्या पोरीला आणि तुम्ही…तुम्ही तिची अक्कल काढता…. नाही म्हणजे असेल माझी पोर साधी भोळी पण पण म्हणून हे काय अस घालून पाडून बोलायचं का इतक….  हे तुम्ही चांगलं नाही केलत  तुमच्या आईशीच बोलायला हवाय मला.…. 

हेल्लो…हेल्लो…

आहो बोला की आता का दातखीळ बसली तुमची…

मीने अग बघ फोन कट केला की काय या माणसानी…. काय बाई पोलिस म्हणजे माणुसकी वैगरे नाहीच का याला सासू चा फोन कट केला…. ते काही नाही बर झालं मीच फोन केला आत्ता त्याच्या आई शी बोलते आणि सांगते लग्नाबददल आम्हाला पुन्हा विचार करायला लागेल…. 

आई अग जरा थांब नं फोन बंद लागतोय त्याचा… 

अग कार्टे इतक बोलला तो तुला आणि मला आणि अजून काय थांबायचं आता तुला… तरी मला वाटलंच होत तुझी निवड म्हणजे असलीच असणार काहीतरी…ते काही नाही माझ्याकडून हे लग्न मोडलंय बस….






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाती....

ओंजळीतली फुले